शेअर बाजारात तेजीचे वादळ; सेन्सेक्सची पुन्हा विक्रमी झेप

Daink Yashwant, Latur Team
Daink Yashwant, Latur Team 11 Views 2 Min Read
2 Min Read

मुंबई : भारतीय शेअर बाजाराने पुन्हा एकदा नवीन शिखर गाठले आहे. देशांतर्गत मार्केटचे दोन्ही प्रमुख निर्देशांक -सेन्सेक्स आणि निफ्टीने पुन्हा एकदा रेकॉर्ड मोडीत काढून नवीन शिखरावर उडी घेतली. जागतिक बाजारातील सकारात्मक घडामोडी दरम्यान शुक्रवारी सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स आणि निफ्टीने सर्वकालीन उच्चांक गाठला. भारतीय शेअर बाजारात सातत्याने तेजीसह व्यवहार होत असून निफ्टी, सेन्सेक्स आणि मिडकॅप निर्देशांक नवीन शिखरांवर व्यवहार करत आहेत.

- Advertisement -

सेन्सेक्सची पुन्हा विक्रमी तेजी
आज आणखी एक इतिहास रचत बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या सेन्सेक्सने प्रथमच ७१,००० अंकांचा टप्पा पार केला आणि ७१,०८४ अंकांचा नवीन सर्वकालीन उच्चांक नोंदवला. या कालावधीत सेन्सेक्स ५७० अंकांहून अधिक अंकांनी वाढला तर, निफ्टीने प्रथमच २१,३५० अंकांची पातळी ओलांडली. सकाळी १०:३१ च्या सुमारास निफ्टी १५१ अंकांनी वाढून २१,३३४ वर तर सेन्सेक्स ५०५ अंकांनी वधारून ७१,०१९ अंकांवर होता.

- Advertisement -

बाजारात तेजीचे वादळ
गेल्या काही दिवसांपासून बाजारात तेजीचे वारे वाहत असून दोन्ही मार्केट निर्देशांकांनी आजही विक्रम मोडण्यास सुरुवात केली. सेन्सेक्स २८९ अंक वाढीसह ७०,८०४ अंकांवर उघडला, तर निफ्टी ५० ने आज १०४ अंक वाढून २१,२८७ वर दिवसाचा व्यवहार सुरू केला. सेन्सेक्स ७०,८०० अंकांच्या वर उघडण्याची ही पहिलीच वेळ असून सुरुवातीच्या व्यवहारातच सेन्सेक्सने ७०,८५३.५६ अंकांचा नवा उच्चांक गाठला होता.

- Advertisement -

यूएस स्टॉक मार्केट
अमेरिकी शेअर बाजार निर्देशांक डाऊ जोन्स औद्योगिक सरासरी १५८ अंकांनी ३७,२४८ वर, तर एस अँड पी १२ अंक म्हणजेच ०.२६% वाढून ४,७१९ वर पोहोचला. तसेच नॅसडॅक कंपोझिट २७ अंक किंवा ०.१९% उडी घेत १४,७६१ वर पोहोचला.

कोणत्या शेअर्समध्ये सर्वाधिक तेजी
निफ्टी टॉप गेनर्सपैकी हिंदाल्को २.६५ टक्क्यांच्या वाढीसह ५५७.५ अंकांवर होता. जेएसडब्ल्यू स्टील देखील २.०७ टक्क्यांनी वाढून ८६४.९ रुपयांवर होता. टाटा स्टील १.६७% वाढीसह १३४.२ रुपयांवर, इन्फोसिस १.६२% वाढून १,५२५.७५ रुपयांवर आणि ओएनजीसी १.४३% वाढून १९८.७५ रुपयांवर व्यवहार करत आहे.

बँक निफ्टी सुरुवातीच्या व्यवहारात किंचित घसरणीसह लाल रंगात व्यवहार करीत आहे. निफ्टी फायनान्शिअल सर्व्हिसेस, एफएमसीजी, रियल्टी निर्देशांकही कमजोर दिसत आहेत. निफ्टी मेटल इंडेक्समध्ये कमालीची वाढ झाली असून आयटी निर्देशांकाने अजूनही मजबूत आघाडी कायम ठेवली आहे. मीडिया, फार्मा, पीएसयू बँका, खाजगी बँकाही हिरव्या रंगात व्यवहार करत होत्या.

Share This Article