संतप्त जमावाने केलेल्या मारहाणीत अण्णा वैद्यचा मृत्यू

Daink Yashwant, Latur Team
Daink Yashwant, Latur Team 23 Views 3 Min Read
3 Min Read

अहमदनगर: अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील सुगाव खुर्द येथील महिलांच्या खून प्रकरणात शिक्षा भोगलेला व काही गुन्ह्यांत निर्दोष मुक्त झालेला मच्छिंद्र उर्फ अण्णा वैद्य (वय ५८) याने रविवारी (दि. १०) सायंकाळी एका अल्पवयीन मुलीची छेडछाड केली. त्यास संतप्त जमावाने चोप दिला. उपचारासाठी त्याला संगमनेर येथे हलवण्यात आले असता त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान जमावाच्या हल्ल्यात अण्णा वैद्यचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताच अकोले तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

चार महिलांचा खून करून त्यांना शेतात पुरून ठेवल्याच आरोप अण्णावर होता. संगमनेर येथील ताराबाई आसाराम राऊत (वय ४५) या महिलेचा खून करून पुरावा नष्ट केल्याच्या आरोपावरून संगमनेरच्या न्यायालयाने वैद्य याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. विद्युत मोटार केबल चोरी प्रकरणात गावकऱ्यांनी त्याला पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतर हे साखळी खून प्रकरण उजेडात आले. या प्रकरणात त्याला जन्मठेपदेखील झाली होती. नंतर त्याची निर्दोष मुक्तता झाल्यावर तो सुगाव येथे राहत होता.रविवारी सायंकाळी अल्पवयीन मुलीची त्याने छेड काढली. त्यामुळे संतप्त जमावाने त्यास मारहाण केली व पोलिसांत फिर्याद दिली. या प्रकरणी अकोले पोलिस स्टेशनला पोक्सो, ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल आहे. त्याला उपचारासाठी रात्री ८.३० वाजता संगमनेर येथे हलवण्यात आले होते. त्यावेळी डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाला असल्याचे घोषित केले.

- Advertisement -

घराचे दार तोडून पीडित मुलीसोबत असभ्यवर्तन

संबंधित पिडीत मुलीने दिलेल्या फिर्यादित म्हटले की, रविवारची सुटी असल्याने दुपारी मैत्रिणीकडे जात होते. त्याचवेळी अण्णा वैद्य हा त्याच्या घरासमोर उभा होता. मला पाहताच त्याने ‘ए पोरी इकडे ये’, म्हणून हाक मारली. मग मी घाबरल्याने लगेच घरी पळत जात होते. त्याचवेळी अण्णा माझ्यामागे येत असल्याचे दिसले. मग मी घरात गेल्यावर आतून कडी लावून आत बसले. हे पाहून अण्णा वैद्य दरवाजाला लाथा मारून तोडत होता. दार तोडून तो घरात येताच ,तू बोलावले तर का आली नाहीस’, असे म्हणत माझे केस धरून मला घराबाहेर काढले. तसेच मला जोराने मारहाण केली व एका खांबावर ढकलून दिले. त्यावेळी माझ्या डोक्याला आणि मानेला मार लागला. मला सोडविण्यासाठी माझे नातेवाईक आले तर त्यांनाही मारण्याचा दम दिला. मला फाशी देण्याची धमकी देऊन माझ्याशी असभ्य वर्तन केले. हे पाहून गावातील काही माणसं गोळा झाली. त्यातील काहींनी मला कसेबसे सोडविले, असे पीडित मुलीने म्हटले आहे.

- Advertisement -

चार महिलांच्या खुनाचा आरोप

अण्णावर विविध प्रकारच्या गुन्ह्यांसह चार महिलांचा खून केल्याचा आरोप आहे. खुनाच्या पहिल्या खटल्यात संगमनेर न्यायालयात त्याला झालेली जन्मठेप उच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवली होती. त्यानंतर काही महिन्यांत दुसऱ्या खुनाच्या खटल्यातून संगमनेरच्या न्यायालयाने त्याची निर्दोष सुटका केली. तर तिसऱ्या खटल्यात त्याला पुन्हा जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. तर एका महिलेच्या खुनाचा खटला प्रलंबित असल्याचे सांगण्यात येत आहे.

Share This Article