चैत्यभूमीवर अस्वच्छता पाहून अजितदादांच्या संतापाचा पारा चढला

Daink Yashwant, Latur Team
Daink Yashwant, Latur Team 5 Views 2 Min Read
2 Min Read

मुंबई: झपाट्याने आणि जागच्या जागी निर्णय घेऊन प्रशासकीय कामे वेगाने मार्गी लावणारा नेता म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ओळख आहे. एखाद्या सरकारी अधिकाऱ्याकडून कामात दिरंगाई होत असल्यास त्याला ऐकवताना अजित पवार कोणताही मुलाहिजा बाळगत नाहीत. त्यांच्या याच वृत्तीचा प्रत्यय बुधवारी चैत्यभूमीवर सर्वांना आला. महापरिनिर्वाणदिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार हे बुधवारी सकाळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी दादर येथील चैत्यभूमीवर गेले होते. यावेळी अजित पवार यांनी चैत्यभूमीला लागून असलेल्या समुद्रातील व्ह्यूईंग डेकलाही भेट दिली. मात्र, याठिकाणी असणारी अस्वच्छता पाहून चोख कामाचा आग्रह बाळगणारे अजित पवार चांगलेच वैतागले. यानंतर अजित पवार केवळ नापसंती व्यक्त करुन थांबले नाहीत तर त्यांनी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांना तातडीने याठिकाणी बोलावून घेतले.

- Advertisement -

अजित पवार यांनी फोन केल्यानंतर इक्बालसिंह चहल काहीवेळातच व्ह्यूईंग डेकवर पोहोचले. तेव्हा अजित पवार यांनी सगळ्यांना बाजूला करत व्ह्यूईंग डेकवरची अस्वच्छता इक्बालसिंह चहल यांच्या निदर्शनास आणून दिली. हे सर्व करताना अजित पवार सातत्याने चहल यांना सूचना देत होते. व्ह्यूईंग डेकवर एका दिशेने बोट दाखवत अजित पवार यांनी चहल यांना त्याठिकाणी सुशोभीकरणासाठी ठेवण्यात आलेल्या झाडांपैकी काही झाडं मेल्याचे सांगितले. ‘या झाडांचं पूर्णपणे नुकसान झालंय आणि आपण काय करतोय?’, असा सवाल अजित पवार यांनी चहल यांना विचारला. ही झाडं आजच बदला, असा आदेश अजितदादांनी चहल यांना दिला. त्यावर इक्बालसिंह चहल यांनी मी तातडीने झाडं बदलून घेतो, असे म्हटले. त्यानंतर अजित पवार यांनी चहल यांना व्ह्यूईंग डेकवर साफसफाई ठेवण्याच्या सूचनाही दिल्या.

- Advertisement -

यावेळी शेजारीच उभ्या असलेल्या काही लोकांनी या परिसरातील एका उद्यानाच्या दुर्दशेचा प्रश्न अजित पवार यांच्यासमोर मांडला. पालिका उद्यानांकडे लक्ष देत नाही. उद्यानांमधील वस्तू, उपकरणे खराब झाल्याचे एका व्यक्तीन अजित पवार यांना सांगितले. त्यावर अजित पवार यांनी आपला मोर्चा पुन्हा पालिका आयुक्त चहल यांच्याकडे वळवला. त्यांना उद्देशून अजित पवार यांनी म्हटले की, ‘आपण याकडे लक्ष देत नाही का? गार्डन विभागाची जबाबदारी अमक्याकडे, अशी कामाची विभागणी होत नाही का?, अशा प्रश्नांची सरबत्ती चहल यांच्यावर केली. अजित पवारांच्या या प्रश्नांवर इक्बालसिंह चहल यांनी फार काही न बोलता सर्व कामे तातडीने मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.

- Advertisement -

Share This Article