अजित पवार गटाकडून कार्यकर्त्यांचीच नव्हे तर पदाधिकाऱ्यांचीही प्रमाणपत्रे बोगस

Daink Yashwant, Latur Team
Daink Yashwant, Latur Team 7 Views 4 Min Read
4 Min Read
Highlights
  • शरद पवार गटाचा युक्तिवाद

मुंबई: अजित पवार  गटाकडून केवळ कार्यकर्त्यांचीच नव्हे तर पदाधिकाऱ्यांचीही बोगस प्रमाणपत्र जमा करण्यात आल्याचा दावा शरद पवार  गटाने केला आहे. शरद पवार गटाच्या अभिषेक मनु सिंघवी यांनी युक्तिवाद करताना हा दावा केला आहे. तर शरद पवार गटाकडून सातत्याने तेच तेच मुद्दे मांडण्यात येत असून वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप अजित पवार गटाने केला. राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाकडून आजचा युक्तिवाद संपला असून पुढची सुनावणी 24 नोव्हेंबर रोजी होणार आहे.

- Advertisement -

राष्ट्रवादी पक्ष कुणाचा, पक्षावर दावा कुणाचा याची सुनावणी निवडणूक आयोगात सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुरू असलेल्या सुनावणीसाठी शरद पवार गटाकडून अभिषेक मनु सिंघवी युक्तिवाद करत आहेत तर अजित पवार गटाकडून नीरज किशन कौल आणि मनिंदर सिंह युक्तिवाद करत आहेत.

- Advertisement -

शरद पवार स्वतः या सुनावणीसाठी उपस्थित असून त्यांच्यासोबत खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार जितेंद्र आव्हाड उपस्थित आहेत. तर अजित पवार गटातर्फे पार्थ पवार निवडणूक आयोगात उपस्थित आहेत.

- Advertisement -

आयोगाकडून शरद पवार गटाची कानउघाडणी

केंद्रीय निवडणूक आयोगाने शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांची कानउघडणी केली. ज्या मुद्द्यांवर गेल्या सुनावणीत आपण युक्तिवाद केला होता त्याचं प्रतिज्ञापत्राच्या मुद्द्यांचा आपण पुन्हा उल्लेख करु नका असं निवडणूक आयोगाने सांगितलं. तेच तेच मुद्दे घेतल्याने आयोगाने नाराजी व्यक्त केली.

 

दोन्ही गटांच्या वकिलांमध्ये खडाजंगी

राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणीस कुवर प्रताप सिंह हे शरद पवार गटाकडे आहेत. तसं प्रतिज्ञापत्रकही त्यांनी दिलं आहे. असं असताना अजित पवार गटाकडून कुवर प्रताप सिंह यांची खोटी सही करून त्यांचं बोगस प्रतिज्ञापत्रक जमा करण्या आलं असल्याचा दावा शरद पवार गटाकडून करण्यात आला आहे. अजित पवार गटाकडून खोटी कागदपत्रं जमा करून निवडणूक आयोगाची दिशाभूल करण्यात येत असल्याचा दावा सरद पवार गटाकडून करण्यात आला.

अजित पवार गटाच्या वकिलांचा युक्तिवाद 

शरद पवार गटाच्या वकिलांनी केलेला युक्तिवाद अजित पवार गटाकडून खोडून काढण्यात आला. शरद पवार गटाकडून सातत्याने खोटी माहिती दिली जात आहे आणि तेच ते मुद्दे मांडले जात असल्याचं अजित पवार गटाने म्हटलं आहे. या माध्यमातून शरद पवार गटाकडून वेळकाढूपणा केला जात आहे, त्यामुळे ही केस निकाली काढावी अशी मागणीही अजित पवार गटाने केली आहे.

अजित पवार यांच्या अध्यक्षपदावर प्रश्नचिन्ह 

शरद पवार गटाकडून अजित पवार यांच्या अध्यक्ष पदाच्या निवडीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आला. जर शरद पवार यांच्या अध्यक्षपदाच्या निवडीवेळी अजित पवार यांनी प्रस्तावक म्हणून सही केली होती. मग दहा महिन्यात नेमकं काय झालं की त्यांनी अध्यक्षपदी दावा केला असा सवाल विचारला.

अजित पवार राष्ट्रीय अध्यक्ष कधी झाले? अध्यक्ष पदाच्या निवडीबाबत राष्ट्रीय अधिवेशन कधी घेतले? अध्यक्षपदासाठी त्यांनी अर्ज कधी केला ती तारीख काय होती? अध्यक्षपदाच्या निवडी वेळी निवडणूक निर्णय अधिकारी कोण होते? असे प्रश्न शरद पवार गटाच्या वकिलांनी अजित पवार गटाला केले. अजित पवार यांच्या अध्यक्षपदाच्या निवडी बाबतच्या बैठकीचं कव्हरेज कोणत्या चॅनलवर पाहिला मिळालं का? असा सवालही शरद पवार गटाकडून करण्यात आला.

राष्ट्रवादीतल्या चिन्हाच्या लढाईचा घटनाक्रम

– 2 जुलै रोजी अजित पवार गटाचा शपथविधी.
– शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगात 5 जुलै रोजी  कॅव्हिएट दाखल.
– अजित पवार गटानं 30 जून रोजीच झालेल्या बैठकीत राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून अजित पवारांची निवड झाल्याचा दावा केला, 40 आमदार आपल्या बाजूनं असल्याचाही दावा.
– निवडणूक आयोगानं त्यावर दोन्ही बाजूंना नोटीसा देत 8 सप्टेंबर पर्यंत आपली बाजू मांडण्यास सांगितलं.
– दोन्ही बाजूची कागदपत्रं पाहिल्यानंतर आयोगानं आता या सुनावणीसाठी 6 ऑक्टोबर ही तारीख दिली होती.
– अजित पवार गटाने 20 हजार बोगस कागदपत्रे जमा केल्याचा आरोप शरद पवार गटाने केला आहे.

Share This Article