व्यवसाय वृद्धीसाठी दौलत धांडगे यांनी केलेला जुगाड पाहून अधिकारी चक्रावले

Daink Yashwant, Latur Team
Daink Yashwant, Latur Team 53 Views 2 Min Read
2 Min Read

जालना: आपल्या दुभत्या तसेच गाभण म्हशींना तंदुरुस्त बनविण्यासाठी गांजाचा खुराक खाऊ घालण्यासाठी एका शेतकऱ्याने चक्क पपईच्या शेतात गांजाची लागवड केल्याचं धक्कादायक प्रकार राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने काल सोमवारी (दि.२८) दुपारी जालना जिल्ह्याच्या घनसावंगी तालुक्यातील राहेरा येथील शेतात छापा टाकला असता उघडकीस आला आहे.या धाडीत सुमारे २ लाख रुपये किमतीची गांजाची झाडे जप्त करण्यात आली आहेत.

- Advertisement -

राहेरा येथील शेतकरी दौलत लिंबाजी धांडगे यांचा म्हशींच्या खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे.या व्यवसाय वृद्धीसाठी त्यांनी केलेला जुगाड पाहून राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पथकही चक्रावले. धांडगे यांनी आपल्या शेतात चक्क गांजाची लागवड करून त्या गांजाचा खुराक ते म्हशींना देत असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला गुप्त महितीदारमार्फत मिळाली होती.या माहितीच्या आधारे उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने सदर ठिकाणी छापा टाकला असता, धांडगे यांच्या पपईच्या शेतात गांजाची लागवड केल्याचे आढळून आले.

- Advertisement -

म्हशींना गांजाचा खुराक दिल्यानंतर त्या जास्त प्रमाणात चारा खातात,त्यामुळे त्या सुदृढ आणि तंदुरुस्त होतात. अशा म्हशींच्या विक्रीतून चांगला नफा होत असल्याने धांडगे यांनी शेतीतच जुगाड करून म्हशींना खुराक देण्यासाठी गांजाची लागवड केल्याचे त्याच्या चौकशीतून उघड झाले.या कारवाईत पथकाने पपईच्या शेतातील काही गांजाची झाडे तसेच जनावरांच्या गोठ्यावर वाळत घातलेला १६ किलो गांजा जप्त केला आहे.या गांजाची किंमत जवळपास २ लाख रुपये असल्याचे कळते आहे. या प्रकरणी तीर्थपुरी पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत कुठलीही नोंद नव्हती. दरम्यान, सदर शेतकरी गांजा म्हशींना खायला देत होता की विक्री करत होता याबाबत तपास करण्यात येत असल्याचे उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक गणेश पुसे, दुय्यम निरीक्षक भी. सु. पडूळ, बी.के. चाळणेवार, बी. ए. दौंडे, पी.बी. टकले, व्ही. डी. पवार, एस.जी.कांबळे, बी.पी. टकले, व्ही.डी. अंभोरे, आर. आर. पंडित यांनी ही कारवाई केली.

- Advertisement -

Share This Article