सनी देओलचा बंगला वाचवला, मग नितीन देसाईंना वेगळा न्याय का? -संजय राऊत

Daink Yashwant, Latur Team
Daink Yashwant, Latur Team 28 Views 2 Min Read
2 Min Read

अभिनेता आणि भाजप खासदार सनी देओल यांच्या बंगल्याच्या लिलाव होणार असल्याचे गेल्या आठवड्यात समोर आलेले आणि काहीच तासात बँक ऑफ बडोदाने हा लिलाव रद्द केल्याचीही नोटीस बजावली. दरम्यान याच विषयावरुन ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी भाजपवर हल्ला चढवला. त्यांनी दिवंगत कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्यासोबत काय घडले, याची आठवण करुन देत देओल यांच्या बंगल्याच्या विषयावर टीका केली.

- Advertisement -

राऊत म्हणाले की, ‘अभिनेता सनी देओल यांच्या जुहू येथील बंगल्याचा लिलाव बँक ऑफ बडोदाकडून केला जाणार होता. ते जवळपास ६० कोटींचं कर्ज फेडू शकले नव्हते, त्यामुळे बँकेने लिलाव करण्याचा निर्णय घेतला. सनी देओल यांच्याशी कोणतेही वैयक्तिक भांडण नाही, ते एक चांगले अभिनेता आणि व्यक्ती आहेत.’

- Advertisement -

नितीन देसाईंविषयी बोलताना ते पुढे म्हणाले की, ‘मात्र २४ तासात तुम्ही लिलाव थांबवला, दिल्लीतून संदेश आला. त्यांचे घर आणि त्यांनाही वाचवले. मात्र आमचे नितीन देसाई त्यांचा स्टुडिओ वाचवण्यासाठी दारोदार भटकत होते. त्यांनीही कर्ज चुकवायचे होते. त्या घटनेच्या दोन दिवस आधी ते दिल्लीला गेले होते, भाजप नेते आणि मंत्र्यांची त्यांनी भेट घेतली. मात्र त्यांना कोणताही दिलासा दिला गेला नाही. नितीन देसाईंचा स्टुडिओही वाचवला नाही आणि त्यांचा जीवही वाचवला नाही.’ दिल्लीतून सूत्र हलवल्यानंतर २४ तासात सनी यांचा बंगला वाचवण्यात आला, मग हाच न्याय नितीन देसाईंना का नाही? असा सवाल यावेळी राऊत यांनी केला.

- Advertisement -

संजय राऊत यांनी या पत्रकार परिषदेत अशी माहिती दिली की, नितीन देसाई यांनी दिल्लीत जाऊन काही महत्त्वाच्या भाजप नेत्यांची भेट घेतली होती. त्यांनी कोणाचेही नाव यावेळी घेतले नाही. राऊत यांनी असेही सांगितले की यावेळी नितीन देसाईंच्या डोळ्यात पाणी होते, या नेत्यांना त्यांनी असे म्हटलेले की- माझं स्वप्न वाचवा. ‘भाजपचे खासदार, स्टार प्रचारक असणाऱ्या सनी देओल यांना एक न्याय आणि आमच्या नितीन देसाईंना एक न्याय, असं का? तुम्ही देसाईंना मरू दिलं, त्यांच्या स्टुडिओचा लिलाव होऊ देताय’, असा आरोप यावेळी त्यांनी केला.

संजय राऊत यांनी असा आरोप केला जे भारतीय जनता पार्टीच्या नात्यातील आहेत त्यांची कोट्यवधींची कर्ज माफ केली जातात, मात्र देसाईंच्या बाबतीत असा कोणताही निर्णय घेतला नाही. त्यांनी असे म्हटले की, ‘देसाईंना यांनी मरू दिले, त्यांना आत्महत्येसाठी प्रवृत्त केले गेले. सध्या देशात हेच सुरू आहे.’

Share This Article