नांदेडहून उदगीर कडे हरभरा घेऊन जात असलेला ट्रक मन्याड नदीच्या पुलाच्या कटड्यांच्या मधो-मध अडकला

Daink Yashwant, Latur Team
Daink Yashwant, Latur Team 31 Views 2 Min Read
2 Min Read

नांदेडहून उदगीर कडे हरभरा घेऊन जात असलेला एक ट्रक मन्याड नदीच्या पुलाच्या कटड्यांमध्ये मधो-मध अडकला आहे,या रस्त्यावर झालेल्या मोठमोठ्या खड्ड्यामुळे दि.२४ऑगस्ट रोजी रात्री बाराच्या सुमारास हा अपघात झाला असून पुलावर असलेल्या संरक्षक कटड्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. त्यामुळे काळ आला होता.पण वेळ आली नव्हती असा प्रत्यय त्या अपघातग्रस्त ट्रक चालकाच्या बाबतीत आला असून ही चर्चा कंधार व परिसरात ऐकावयास मिळत होती.

- Advertisement -

याबाबत सविस्तर वृत्त असे की एम.एच २६ ए.डी २७१३ या क्रमांकाचा एक ट्रक हरभरा घेऊन नांदेड हून उदगीर कडे जात होता. रात्री बारा वाजताच्या सुमारास मन्याड नदीवर पुलाच्या अलीकडे हा ट्रक आला. तेव्हा या पुलावर लाईटचा अभाव असल्यामुळे हा ट्रक खड्ड्यात गेला तेव्हा रस्त्यामध्ये मोठ-मोठे खड्डे होते,एका खड्ड्यातून ट्रक वर आल्यानंतर काहीतरी मोठा आवाज आल्यानंतर चालक पाठीमागे पाहत असल्यामुळे त्याचे ट्रक वरील नियंत्रण सुटून हा ट्रक पुलाच्या कटड्यावर जाऊन धडकला या कटड्यामुळे तो नदीपात्रात पडला नाही. त्यामुळे मोठी जीवित हानी टळली आहे,या अपघातग्रस्त गाडीचे मोठे नुकसान झाल्याची चर्चा ऐकावयास मिळत होती.

- Advertisement -

कंधार पासून दोन कि.मी अंतरावर बहादरपुरा हे गाव आहे. शेकापचे ज्येष्ठ नेते माजी खासदार कै.डॉ.केशवराव धोंडगे व माजी आमदार गुरुनाथराव कुरुडे यांचे गाव हे गाव आहे. या गावातून नांदेड बिदर हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५० गेला आहे. या महामार्गाचे बरेचसे काम अर्धवट अवस्थेत असून मानसपुरी ते जंगमवाडी ( फाटा ) हे तीन कि.मी अंतर असून या तीन किलोमीटर अंतरावर अनेक ठिकाणी मोठ-मोठे खड्डे पडले आहेत,तर बऱ्याच ठिकाणचा रस्ता खचला देखील आहे,या रस्त्यावरून वाहतूक करीत असताना वाहन चालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो,वाहन चालकांचा जीवात जीव नसतो.

- Advertisement -

या सर्व बाबीचा प्रत्यय नांदेड हुन उदगीर कडे हरभरा घेऊन जाणाऱ्या ट्रक चालकास दि.२४ ऑगस्ट रोजी रात्री बाराच्या सुमारास खड्डा चुकवीत असताना आला. हा ट्रक मन्याड नदीच्या पुलावर संरक्षक कटडे तोडून पुलाच्या मधो-मध अडकला आहे. कटड्यामुळे मोठी दुर्घटना टळली असून अपघात ग्रस्त ठिकाणी बघ्यांनी एकच गर्दी केली होती.

Share This Article