काँग्रेसचे 7, तर शरद पवार गटाचे 5 आमदार अजित पवारांच्या संपर्कात

Daink Yashwant, Latur Team
Daink Yashwant, Latur Team 49 Views 2 Min Read
2 Min Read

मुंबई: आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रात आणखी एक राजकीय भूकंप होईल. त्यामध्ये काँग्रेस आणि शरद पवार गटातील आमदार मोठ्या प्रमाणावर फुटतील, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी केला. गेल्या काही दिवसांमध्ये काँग्रेसच्या मिलिंद देवरा, बाबा सिद्दीकी आणि अशोक चव्हाण या बड्या नेत्यांनी पक्षांतर केले होते. यामुळे काँग्रेसच्या गोटात खळबळ माजली होती. परंतु, येत्या काही दिवसांमध्ये महाविकास आघाडीच्या गोटात यापेक्षा मोठा भूकंप होईल, असे मिटकरी यांनी सांगितले. ते बुधवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

- Advertisement -

अमोल मिटकरी यांनी राजकीय भूकंपाच्या शक्यतेबाबत वाच्यता करताना खळबळजनक माहिती दिली. काँग्रेस आणि शरद पवार गटाचे काही आमदार राष्ट्रवादीच्या नेतृत्त्वाच्या संपर्कात आहेत. काही आमदारांनी अजित पवारांची भेटही घेतली आहे. यामध्ये काँग्रेसच्या ७ तर शरद पवार गटाच्या ५ आमदारांचा समावेश असल्याचे मिटकरी यांनी सांगितले. तसेच आगामी निवडणुकीत महाविकास आघाडीने राष्ट्रवादी काँग्रेसविरोधात कोणताही उमेदवार रिंगणात उतरवावा. पण त्याचा फायदा होणार नाही. अनिल तटकरे येऊ देत किंवा कोणी युगेंद्र-जोगेंद्र येऊ दे, आम्हाला फरक पडत नाही, असे अमोल मिटकरी यांनी म्हटले.

- Advertisement -

काही दिवसांपूर्वीच अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. काँग्रेसच्या अनेक आमदारांनी त्यांना संपर्क करुन पाठिंबा दर्शवल्याची माहिती आहे. अशोक चव्हाण यांच्या निर्णयामुळे काँग्रेसमधील अनेक नाराज आमदारांना भाजपची दारे खुली झाल्याचे बोलले जाते. त्यामुळे लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसचे आणखी १० ते ११ आमदार फुटू शकतात, अशी शक्यता वर्तविली जात आहे.

- Advertisement -

शरद पवार यांच्या जवळचा मानला जाणारा बडा नेता लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचीही चर्चा सध्या रंगली आहे. या चर्चेचा रोख जयंत पाटील यांच्या दिशेने असल्याचे सांगितले जाते. जयंत पाटील आणि त्यांचा मुलगा भाजप नेत्यांच्या संपर्कात असून लवकरच ते पक्षांतर करतील, अशी कुजबूज राजकीय वर्तुळात सुरु आहे.

Share This Article