चार कोटींचा मामला, पोलिसांचा मास्टरप्लॅन अन् अवघ्या ३० तासांत दरोडेखोर गजाआड

Daink Yashwant, Latur Team
Daink Yashwant, Latur Team 11 Views 1 Min Read
1 Min Read

मुंबई: काळबादेवीच्या रामवाडी परिसरात आदित्य हाइट्स या इमारतीमध्ये ‘के.डी.एम. इंटरप्रायझेस’ या नावाने अंगडिया यांचे कार्यालय आहे. रविवारी या कार्यालयात चार अनोळखी तरुण घुसले. त्यांनी आत असलेल्या दोन कामगारांना दोरीने बांधले आणि चार कोटी पाच लाख रुपयांची रोख रक्कम घेऊन ते इतर दोन साथीदारांच्या मदतीने पसार झाले. अंगडिया यांनी याबाबत माहिती दिल्यानंतर लोकमान्य टिळक मार्ग पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळाचा पंचनामा करीत पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

- Advertisement -

मोठी रक्कम चोरीला गेल्याने सहायक पोलिस आयुक्त ज्योत्स्ना रासम, लोकमान्य टिळक मार्ग पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तत्काळ शोध सुरू केला. रक्कम आणि आरोपींची संख्या मोठी असल्याने लोकमान्य टिळक मार्ग पोलिसांबरोबर पायधुनी, व्ही. पी. रोड पोलिस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची पथके तयार करण्यात आली. पथकातील प्रत्येकाला वेगवेगळी जबाबदारी देण्यात आली.

- Advertisement -

काळबादेवी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी करीत असताना एकामध्ये अंगडिया यांच्या कार्यालयात काही दिवसांपूर्वी रूजू झालेल्या हर्षद ठाकूर याचा चेहरा दिसला. यावरून पोलिसांच्या तपासाला चालना मिळाली. यानंतर तांत्रिक पुराव्यांचे विश्लेषण करीत असताना आरोपी पालघर परिसरात असून, गुजरातला पळण्याच्या तयारीत असल्याचे समजले. पोलिसांनी पालघर गाठले आणि हर्षदसह राजूबा वाघेला, अशोक वाघेला, चरणभा वाघेला, मेहूलसिंग ढाबी आणि चिराग ठाकूर यांना अटक केली. हे सर्व आरोपी मूळचे गुजरात येथील असल्याचे पोलिसांनी सांगितले.

- Advertisement -

Share This Article